cricket :महाराष्ट्रातही बुलडोझर पॅटर्न, मॅच बघताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, भंगारवाल्याचं दुकान पाडलं
cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले 242 धावांचे लक्ष्य भारताने 42.3 षटकांतच पूर्ण केले. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमी फायनलमध्ये स्थान जवळपास निश्चित झाले आहे. भारताच्या या मोठ्या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा – पोलिसांची कारवाई
भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये मात्र एक वादग्रस्त घटना घडली. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान काही लोकांकडून पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचा आरोप झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपींना अटक केली.
आमदार निलेश राणेंची कठोर भूमिका – भंगार व्यावसायिकांचा तळ उद्ध्वस्त
या घटनेनंतर भाजप आमदार निलेश राणे आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाला कारवाईचे निर्देश देत भंगार व्यावसायिकांचा तळ उद्ध्वस्त करण्यास सांगितले. प्रशासनानेही तत्काळ पाऊल उचलत कारवाई केली आणि संबंधित तळ जमीनदोस्त केला. महाराष्ट्रात याआधी उत्तर प्रदेशप्रमाणे बुलडोझर पद्धतीने कारवाई झाल्याची अनेक उदाहरणे आहेत आणि यावेळीही तशीच कठोर कारवाई करण्यात आली.
हॉटेल हटवण्याची कारवाई
याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे एका स्थानिक हॉटेल चालकाने पुण्याच्या पर्यटकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. आमदार निलेश राणे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाला हॉटेल हटवण्याचे आदेश दिले. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित हॉटेल हटवले.
या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने झाराप येथील भावई मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच, आरएसएसच्या नेतृत्वाखाली मंदिरापर्यंत मोठी रॅलीही काढण्यात आली. या घटनांमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.