Walmik Karad : मोबाईलवर वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस? तुझाही ‘संतोष देशमुख’ करू; तरुणाला बेदम मारहाण

Walmik Karad : बीड जिल्ह्यातील धारूर गावात एका तरुणाला वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) बातम्या मोबाईलवर पाहिल्या म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, यापुढे अशा बातम्या पाहिल्यास “संतोष देशमुखसारखीच तुझी अवस्था करू” अशी धमकीही दिली गेली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, गंभीर जखमी

अशोक शंकर मोहिते हा आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. त्याच वेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप त्या ठिकाणी आले.

“वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस?” असा जाब विचारून त्यांनी अशोकला शिवीगाळ केली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नाही, तर “पुढे मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या पाहिल्यास तुझीही संतोष देशमुखसारखी अवस्था करू” अशी धमकी त्यांनी दिली.

गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अशोक मोहितेवर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातीय तणाव वाढत असल्याने चिंता – पोलिसांवर दबाव वाढला

बीडमध्ये आधीच जातीय तणाव वाढला असताना अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा असामाजिक घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण – कृष्णा आंधळे अद्याप फरार

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले असले तरी कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. एसआयटी आणि सीआयडीच्या १०-१२ पथकांचा तपास सुरू असतानाही कृष्णा आंधळेला अटक झाली नाही, यामुळे संशय वाढत आहे.

मनोज जरांगे यांच्या आरोपानुसार “कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवलं असून तो आजूबाजूच्या जिल्ह्यातच आहे.” तर, धनंजय देशमुख यांच्या मते “कृष्णा आंधळेकडे काही मोठी गुपितं आहेत, त्यामुळेच त्याला पकडलं जात नाही.”

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे ४ जानेवारीला पुण्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मात्र, कृष्णा आंधळे फरारच आहे, आणि पोलिसांना तो सापडत नसल्याने संशय अधिकच वाढत आहे.