Ice Factory Blast: उप्पलवाडी औद्योगिक परिसरातील बालाजी आईस फॅक्टरीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात सर्वत्र अमोनिया वायू पसरल्याने श्वास घेणेही कठीण झाले होते.
स्फोट इतका मोठा होता की, सिमेंटच्या भिंती तुटल्या. एका चारचाकी वाहनाचे प्रचंड नुकसान झाले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सुगतनगर आणि कळमना अग्निशन केंद्राचे जवान पोहोचले. अग्निशमन जवानांनी परिसर रिकामा केला आणि आगीवर नियंत्रण आणले.
अमोनियाचे दुष्परिणाम कमीत कमी होतील या दृष्टीकोणातून अग्निशमन जवानांनी परिसर २०० मीटर अंतरापर्यंत मोकळा केला. घटनेची माहिती मिळताच गड्डीगोदाम येथील रहिवासी अजय शाहू यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाल्याची शक्यता आहे. जखमींमध्ये घुमान सिंग (५००), डुंगर सिंग (४५) दोन्ही रा. राजस्थान तर एक श्रावण बघेल (३८) असे आहेत. दोघांना मेयो रूग्णालयात तर घुमानला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमोनिया वायुला अतिशय उग्र वास असतो. अमोनियाचा सर्वाधिक वापर रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी होतो. याशिवाय बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात कुलिंग सबस्टन्स म्हणूनही अमोनियाचा वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त प्रमाणात अमोनिया गेला तर तिचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे अग्निशन केंद्राच्या जवानांनी जीव धोक्यात घालून घटनास्थळी बचाव कार्य केले.
हवेत अमोनियाचे प्रमाण जास्त असल्याने नाक, घसा आणि श्वसनलिकेमध्ये तीव्र जळजळ होते आणि श्वास गुदमरतो, डोळ्यांतून पाणी गळून डोकेदुखीची समस्याही जाणवते. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.