राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक मोठा किस्सा सांगितला. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम पसरविले जात आहेत. मोठा गोंधळ निर्माण करण्यात येत आहे. मात्र, अजितदादा यांनी भर सभेत या विषयाचा खुलासा केला. तसेच याबाबतची शंका देखील दूर केली आहे.
यावेळी अजित पवारांनी एक महत्वाची घोषणाही केली. ते म्हणाले, एका महिलेने मला चार चाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळेल का? असे विचारले. त्यावर मी तिला सांगितले की ट्रॅक्टर असला तरी लाभ मिळेल. त्यावर तिने पुन्हा माझे पती ड्रायव्हर आहेत. रात्री घरी येताना ते गाडी घेऊन येतात. मग, तुमचे अधिकारी ती गाडी आमचीच समजतील आणि योजनेचा लाभ देणार नाहीत असे म्हटले.
असे गैरसमज अनेक महिलांचे होत आहेत. पण, तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नींना सांगू इच्छितो जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल. पण, तुमच्या स्वत:च्या नावावर चारचाकी असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, या योजनेवरून बराच गोंधळ उडाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तर, या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. यामुळे सध्या सगळ्या महिला अर्ज दाखल करण्यासाठी पळापळ करत आहेत. हा अर्ज भरताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नंतर यासाठी या योजनेत अनेकदा महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेसाठी महिलांनी अर्ज करावा. तो अर्ज वेळेत मंजूर करण्याची काळजी आम्ही घेऊ. या योजनेचा साधारण अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.