मृत्यू समोर होता, पण पोलिस आला धावून; वाहतूक पोलिसाने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

पोलिस हे नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना कोणती मदत लागली तर नक्कीच ते धावून जातात. असाच एक प्रकार कोल्हापूर शहरातून समोर आला आहे. एका वाहतूक पोलिसाने एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

कार चालवत असताना एक व्यक्ती अस्वस्थ झाला होता. त्यावेळी वाहतूक पोलिसाने त्याची कार चालवून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. बाबासाहेब कोळेकर असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

एका व्यक्तीचा जीव वाचवल्यामुळे सर्वत्र या पोलिस कर्मचाऱ्याचे कौतूक होत आहे. रक्तातील साखर वाढल्याने एक व्यक्ती अचानक अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात पोहचवून त्याचा पोलिस कर्मचाऱ्याने जीव वाचवला आहे.

बाबासाहेब कोळेकर हे बुधवारी तावडे हॉटेलजवळ आपले काम करत होते. त्यावेळी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक मारुती कार तिथे अचानक येऊन थांबली. त्यातून एक महिला जोरजोराने ओरडत होती.

त्यावेळी बाबासाहेब यांनी त्याठिकाणी जाऊन बघितले तर कारचालक विलास मुळीक हा अस्वस्थ झालेला होता. त्याची प्रकृती खराब होत होती. त्यामुळे बाबासाहेब लगेचच गाडीत बसले आणि स्वत: त्या गाडीचे स्टेअरिंग हातात घेऊन कारचालकाला फक्त २० मिनिटांत रुग्णालयात घेऊन गेले.

त्यानंतर मुळीक यांना डॉक्टरांनी उपचार दिले. चालकाच्या नातेवाईकांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ते सुद्धा रुग्णालयात पोहचले. त्यांनी कोळेकर यांचे आभार मानले आहे. तुम्ही देवासारखे धावून आलात. तुम्ही खाकी वर्दीतील देवमाणूस आहात, असे म्हणत मुळीक यांच्या नातेवाईकांनी बाबासाहेब कोळेकर यांचे आभार मानले आहे.