अमरावतीत एका ग्राहकाला बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. नारायण कराडे यांनी डी मार्ट मॉलमधून विविध वस्तूंसह बिस्किटांची खरेदी केली होती. मात्र, घरी बिस्किटांचा पुडा उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्या.
यामुळे त्यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर अन्न व औषधी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याने नारायण कराडे संतप्त झाले असून, त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा सवाल उपस्थित केला गेला आहे.
शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे, पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. अशा प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील होत आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आता मॉलमध्ये मिळणाऱ्या मालात देखील अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणांवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मॉलमधील घटनेने आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.