Latur Crime News: मित्रच निघाला वैरी! आईच्या प्रियकरचा ‎कोयत्याने केला गोठ्यात खून; लातूरमधील मन हेलावणारी घटना

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिवलग मित्राचे आणि आईचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

लातूर येथील औसा तालुक्यातील भादा पोलिस ठाणे हद्दीतील वडजी गावात एका तरुणाचा निर्दयीपणे खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता, मयत तरुणाच्याच मित्राने त्याची खून केल्याची कबुली दिली आहे.

झांल असं की, मृत तरुणाचे नाव रणजित उर्फ बाळू तानाजी माळी (वय 22 वर्ष) असे आहे. तो अविवाहित असून आई-वडिलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करायचा. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रणजित आपल्या शेतात मुक्कामी गेला होता. रात्री झोपेत असताना अचानाक रणजितच्या डोक्यात आणि गळ्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस येताच याची माहिती भादा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृत रणजितच्या डोक्यात आणि गळ्यावर अनेक जखम झाल्या होत्या. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

दरम्यान, पोलिसांनी गावात चौकशी केली असता, मृत रणजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तसेच तिचा मुलगा रणजितचा खूप जवळचा मित्र होता, असे समोर आले. पोलिसांनी या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी या मुलाची कसून चौकशी केली. त्याने शेवटी रणजितचा खून केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याच्या आईशी रणजितचे अनैतिक संबंध होते. याचा त्याला खूप राग आला होता. त्यामुळे त्याने रणजितला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे त्याने आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली आणि रात्री रणजित गोठ्यात झोपला असतानाच त्याचा निर्दयीपणे खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.