शिंदे गटात गेलेल्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले, जेल की पक्षबदल, दोनच मार्ग होते, पत्नीलाही त्रास…

शिवसेना शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार तसेच आतापर्यंतचे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आमदार रवींद्र वायकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वक्तव्य खूप काही सांगून जात आहे.

यावेळी ते म्हणाले, चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजांआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव यात आल्याने माझ्यापुढे पर्याय नव्हता. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या वायकर यांना उत्तर-पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली. या घटनाक्रमाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही.

तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेक वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंब सदस्याला आपण पारखे होतो. तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला. नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले.

आधी नगरसेवक व त्यानंतर १५ वर्षे आमदार म्हणून काम केले. हे काम मी महापालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष असल्यापासून ते राज्यात मंत्री असेपर्यंत कायम केले आहे. आजचा मतदार हा हुशार व जागरूक आहे. तो काम बघतो. त्यामुळे माझ्या कामाच्या विश्वासावर निवडणूक लढवत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, माझ्यावर झालेली कारवाई राजकीय आहे. कुणीच मला काही हमी देत नव्हते. साहजिकच माझ्यापुढे काही पर्याय नव्हते, असे वायकर यांनी नमूद केले. यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.