Leopard attack : ४ वर्षाच्या शिवांगची तब्बल ५ तास मृत्युशी झुंज अखेर संपली, अंगावर काटा आणणारा शेवट

Leopard attack : सध्या जुन्नर येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथील आळे गावातील तितर मळ्यातील अमोल भुजबळ यांच्या घरातील अंगणात खेळत असलेल्या शिवांश भुजबळ या चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

असे असताना या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवांशचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या परिसरात सातत्याने होणाऱ्या उपद्रवाची दखल घेऊन पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवांश हा त्याच्या आजोबांसोबत घराच्या अंगणात खेळत होता. यावेळी ऊसाच्या शेतातून बिबट्याने अचानक झडप घातली. शिवांशची मान पकडून त्याला जखमी केले. या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने हिमतीने बिबट्याच्या मागे पळत जाऊन शिवांशला बिबट्याच्या तावडीतून सोडवले.

तसेच त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. असे असताना मात्र उपचारा दरम्यान शिवांशचा मृत्यू झाला. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जुन्नरमध्ये हा आकडा मोठा आहे.

जुन्नर कार्यक्षेत्रात गेल्या ९ महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या पाचवर गेली आहे. जानेवारी ते एप्रिल या सलग चार महिन्यात चार बळी गेले. आता शिवांशच्या रुपात पाचवा बळी गेला असून एकूण १० जण आतापर्यंत जखमी झाले आहेत.

यामुळे याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. याठिकाणी शेतकरी सध्या शेतात जाण्यास देखील घाबरत आहेत. अनेकांना शेतात बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाताना अडचणी निर्माण होत आहेत.