एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अजूनही राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. येत्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी पुन्हा कामाला लागली असून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत सुरु असणार आहे. या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्ताराकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे कारण शिंदे गटातील नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अशात महाविकास आघाडीतही काही महत्वाच्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाला घेऊन अजित पवार हे सत्तेत सामील झाले आहे. तर शरद पवारांचा गट हा अजूनही महाविकास आघाडीत आहे. भाजपसोबत न जाण्याची त्यांची भूमिका आहे.
शुक्रवारी राज्यातील घडामोडींवर शरद पवार आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आगामी काळात भाजपला कसे उत्तर द्यायचे, याबाबत चर्चा झाली आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत मिळून पुढील निवडणूकीत कोणती रणनिती आखता येईल यावरही चर्चा केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र दौरे सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. पण नक्की काय होणार याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टनंतर महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते एकत्र सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी हे तीन नेते सभा घेणार आहेत.