माझाही नितीन देसाई होऊ शकतो, माझ्या जीवालाही धोकाय; मराठी कलाकाराची धक्कादायक पोस्ट

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांनी त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले होते. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

कर्ज देणाऱ्या कंपनीने नितीन देसाईंची फसवणूक केल्याचीही चर्चा आहे. आता एका मराठी कलाकाराने एक पोस्ट केली आहे. नितीन देसाईंसारखी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणत मराठी कलाकाराने झालेल्या फसवणूकीचा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वप्नील रास्ते असे या कलाकाराचे नाव आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून ते गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्यांनी अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटिंचे फोटोशुटही केले आहेत.

आता त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. आपल्या जीवाला धोका आहे. आपला नितीन देसाई होऊ नये म्हणून त्याने फसवणूकीचे पुरावे जवळच्या एका व्यक्तीकडे पाठवले आहे. या खुलाशांमुळे स्वप्नील रास्ते चांगलेच चर्चेत आले आहे. स्वप्नील रास्ते यांनी एक पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला आहे.

स्वप्नील रास्तेंची पोस्ट-
मी कला, मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्रात काम करणारा एक कलाकार व इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायिक आहे. माझ्यावर कुठलंही कर्ज नाही व मी कोणाचंही कुठलंच देणं लागत नाही. इव्हेंट झाल्यावर वा शूट पूर्ण झाल्यावर कलाकार / तंत्रज्ञ व इतर सर्वांचं ठरलेलं पूर्ण मानधन तत्क्षणी माझ्या कंपनीच्या वा स्वतःच्या खात्यातून देऊन टाकणारा मी एक प्रामाणिक व्यवसायिक आहे. पण काम करून घेऊन माझ्या कष्टाचे कोटी नसले तरी लाखो रुपये कात्रज (पुणे) भागातील एका राजकारण्यानी बुडवलेत.

स्वतःला स्वामीभक्त म्हणवणाऱ्या ह्या माणसाने देतो देतो करत स्वामींचं नाव घेऊन घेऊन ते बुडवलेत. तो आर्थिक दृष्टया पूर्णपणे सधन आहे किंबहुना गडगंज श्रीमंत आहे असं म्हणायला ही हरकत नाही. पण मी अजूनही त्या बुडवलेल्या पैशासाठी लढतोय कारण कागदोपत्री नोंद न ठेवता त्यावेळी केवळ विश्वासावर काम माझ्याकडून घेतलं गेलं व केलं गेलं होतं.

त्याला जवळपास आता ७ वर्ष होत आली आहेत. माझे लाखो रुपये त्याच्याकडून अजून येणं आहे. एकदम सगळे शक्य नसतील तर हळू हळू द्या असं वारंवार सौम्य भाषेत मागून देखील त्यावर कुठलीही सकारात्मक कृती त्याच्याकडून आजवर नाही. मी अनेकदा त्यांना विनंती केली, माझी कौटुंबिक सदस्य ह्या नात्याने माझ्या पत्नीने देखील केली.

तिच्याशीबोलण्याची भाषा देखील अंशी निगरगट्टपणाचीच होती. मी वेळोवेळी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न देखील केला पण आमच्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संभषणावरून आता मात्र मला व माझ्या कटंबातील सदस्यांना त्या माणसाकडन जिवाला धोका संभावतो, घातपाताची शक्यता संभवते, सुड भावनेने हल्ल्याची शक्यता किंवा अपहरणाची शक्यता सुद्धा संभवते.

खोट्याचा आधार घेऊन कुठल्यातरी सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ही हा माणूस सहज करू शकतो, त्यामुळे मी झालेल्या फसवणुकीची यथायोग्यपणे माहिती त्याचा खरा चेहरा जगासमोर येईल अशा काही संभाषणाच्या पुराव्यासह माझ्या जवळच्या काही आप्तेष्टांकडे अपूर्ण का होईना पण आहेत त्या पुराव्यांसह देऊन व लिहून ठेवली आहे.

कारण माझ्या जिवाचं काहीही बरं वाईट हा माणूस नक्की करू शकतो. माझ्यावर कुठलंही कर्ज वा कोणाचंच कुठलंही देणं नसताना देखील माझ्या कष्टाच्या लाखो रुपयांवर त्या व्यक्तीने डल्ला मारल्याचे विचार मनांत येऊन मी अनेकदा तणावाच्या दारात जाऊन परत येतोय. पण लढण्याचा प्रयत्न अजूनही सोडवत नाहीय. मी रास्ते घराण्याशी नातं जोडतो त्यामूळे लढत नक्की राहणार.

सहजपणे ही तक्रार नोंदवावी की नाही याबद्दल मी साशंक आहे, कारण लिखापडीत न ठेवता मी केवळ आधी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे विश्वासावर काम घेतलं होतं आणि पूर्ण केलं होतं. परवाच्या नितीन देसाईंच्या घटनेमुळे अचानक विचार मनात येऊन आपल्यांचा थोडा आधार वाटावा व व्यक्त व्हावं व हा ही एक पुरावा ठेवावा ह्या भावनेने केवळ ही पोस्ट स्वतःच्या सर्व accounts वर लिहीत आहे. मी पूर्णपणे भानावर व stable आहे.

काळजी नसावी फक्तं साथ असावी कारण मी ही आजवर भरपूर काम केलं आहे, अनेकांना वेळोवेळी काम दिलेलं ही आहे व त्याचा ठरलेला मोबदला ही दिलेला आहे कुठलीही वेळ न दडवता. कायद्याने काही शिकवता येत नसेल तर नियतीने अशा माणसांना नक्की धडा शिकवावा ही अपेक्षा.