पनवेल एमआयडीसीतील फार्मा कंपनीत भीषण आग, आगीत कंपनीचं मोठं नुकसान

खालापूर तालुक्यातील पाताळगंगा एमआयडीसीतील कैरे गावातील SPR फार्मा कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिप्ला कंपनीसमोर असलेल्या या फार्मा कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीत जीवितहानी झाली आहे की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स कंपनी, आणि पनवेल महानगरपालिका यांच्यासह अनेक अग्निशमन दलांच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, आगीची तीव्रता वाढल्याने अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.

आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून, यामुळे आगीची भीषणता अधिक स्पष्ट होत आहे. SPR फार्मा कंपनीत कॉस्मेटिक आणि औषधांसाठी लागणारे रॉ मटेरियल तयार केले जात होते. आगीमुळे कंपनीतील बहुतेक सामान जळून खाक झाले आहे.

कंपनी परिसरात असलेल्या केमिकलने भरलेल्या ड्रम्सना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून अधिक नुकसान टाळले जाऊ शकते. आगीच्या वाढत्या तीव्रतेमुळे JSW कंपनी, पनवेल महानगरपालिका आणि इतर अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले आहे.

खालापूरचे तहसीलदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर घटनास्थळी पोहोचले आहेत, तसेच रसायनी पोलिसांचे पथकही उपस्थित आहे.