Pune News: धक्कादायक! थर्टी फस्टच्या पार्टीने घेतला जीव; इंद्रायणीत बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू, कुटुंबाचा काळीज चिरणारा आक्रोश

Pune News: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण नदी काठी, धरणा काठी फिरायला जातात. मात्र, अशा वेळी सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. याचे उल्लंघन केल्याने जीवितहानी होऊ शकते. पुण्यातील मावळ तालुक्यामधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एकाने आपला जीव गमावला आहे. याबाबत बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर भाटी (वय 30, रा. शिक्षक सोसायटी, वराळे) हा मित्रांसोबत मावळ तालुक्यातील वराळे येथे थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी गेला होता. मयूरने त्याच्या मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेट केली. त्यानंतर मयूर मित्रांसोबत इंद्रायणी नदी काठी फिरायला गेले.

यावेळी मयूर नदीत पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ ठरला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वन्य जीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मयूरच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

तसेच, नदीकाठावर फिरायला जाताना किंवा पार्टी करण्यासाठी जाताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.