संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर..

मराठा समाज गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आहे. आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यासाठी गावागावात मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत. अशीच एक बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र यामध्ये मोठा राडा झाला.

या बैठकीत दोन गट भिडले. मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर काहींनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

सध्या राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे. तर दुसऱ्या उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीवर ठाम आहेत. यामुळे समाज आक्रमक आहे.

दरम्यान, यावेळी एक महिला कार्यकर्ती म्हणाली, या बैठकीद्वारे सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जातोय. आम्ही मनोज जरांगे पाटलांबरोबर आहोत. इथे या लोकांची बैठक चालू होती. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती.

तसेच बैठक घेण्यावरून इथे भांडण झालं. आम्ही केवळ मराठा समाजासाठी इथे आलो आहोत. आम्हीदेखील अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. परंतु, यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावले नाही. काहीजण पक्षाकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन इथे आले होते.

दरम्यान, काही लोक ही बैठक कोणी आयोजित केली? ही बैठक कोणी बोलावली आहे? असे प्रश्न विचारत आमच्यावर तुटून पडले, काही लोकांची इथे दडपशाही चालू आहे. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, यामुळे वाद वाढत गेल्याचे एकाने सांगितले.