Mohan Joshi: ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या मोहन जोशींची कशी झालेली सिनेसृष्टीत एन्ट्री? वाचा खडतर प्रवास..

Mohan Joshi : चित्रपटसृष्टीत मोहन जोशी हे एक बडे कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही मोठं नाव कमावले आहे. आजही त्यांना हिंदीतील गंगाजल या सिनेमातील लोकल डॉन साधू यादव या भूमिकेसाठी ओळखलं जाते. मात्र इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आहे.

मोहन जोशींचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला. ते कुटुंबासोबत सात वर्ष बेंगळुरूमध्ये राहिले आणि त्यानंतर ते पुण्यात आले. आज सिनेसृष्टी गाजवलेल्या मोहन जोशींनी कधीही अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पाहिलं नव्हते. मात्र त्यांनी मोठा संघर्ष केला.

त्यांच्या कुटुंबातील कोणीही या मनोरंजन क्षेत्रात नव्हतं. त्यांनी शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पुण्यातून घेतलं. मोहन जोशींचे दोन भाऊ होते. त्यांचे वडील मिलिट्रीमध्ये होते. मोहन जोशींनी ‘हरिकृत फिल्मस’मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला प्रवास सांगितला आहे.

मोहन जोशींनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांत विलेनची भूमिका किंवा निगेटिव्ह शेड असणाऱ्या भूमिका केल्या. त्यांच्या भूमिका अनेकाकांच्या मनात घर करून गेल्या. विलेन बनून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

मोहन जोशींनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये देखील त्यांनी जम बसवला होता. मोहन जोशींकडे दोन-तीन गाड्या होत्या, ते त्या चालवत होते. ते ट्रकदेखील चालवायचे. पण एकदा त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामुळे त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणं बंद केले. 

नंतर ते मुंबईत आले. नोकरी मिळवण्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागला. नोकरी करता करता पुन्हा त्यांनी ट्रक चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला. मात्र चांगल्या कामाच्या शोधात ते होते. ते कोलकाता, भोपाळ आणि देवासपर्यंत गाड्या चालवत होते.

ज्यावेळी ते नोकरी करत ड्रायव्हर होते त्यावेळी त्यांना सतत काम करावं लागत होतं. त्यांनी ९ वर्ष गाडीत माल चढवण्याचं, उतरवण्याचं, माल घेऊन जाण्याचे काम केले. यामुळे ते चित्रपटात काम करतील असा विचारही कोणी केला नव्हता.

त्यांच्या अभिनय करिअरची सुरुवात थिएटरपासून झाली होती. त्यांना कुर्यात सदा टिंगलम या त्यांच्या पहिल्या नाटकातून ओळख मिळाली होती. या नाटकाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर मोहन जोशींना धनंजय नावाची पहिली टीव्ही मालिका मिळाली. नंतर त्यांनी भूकंप या सिनेमात विलेनची भूमिका साकारली होती.

या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यानंतर त्यांनी मागे वळून बघितले देखील नाही. अनेक चित्रपटात त्यांना मोठी कामे मिळाली. आज त्यांच्या नावावर अनेक चित्रपट आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी यामध्ये नाव कमवलं आहे.