Nagpur News : नागपुरात कंपनीत मोठा स्फोट, ९ कामगारांचा मृत्यू, भयंकर माहिती आली समोर…

Nagpur News : नागपुरात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. येथील बाजार गावातील सोलार एक्सप्लोझिव कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत.

या घटनेतील मृतांमध्ये सहा पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करत असताना ही घटना घडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती घेतली.

फडणवीस म्हणाले की, मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. तसेच त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना 5 लाखांची मदत देखील जाहीर केली.

दरम्यान, संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, घटनेनंतर बचावकार्य लगेच सुरू करण्यात आले. जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा स्फोट कशामुळे झाला, याबाबत माहिती नसल्याने आतमध्ये जाण्यास देखील काहीसा वेळ गेला.