Nanded News : नांदेडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळीनी चटके देऊन खून केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
इस्लामपूरा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात पती सह सासरच्या सहाजणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सबा बेगम हिचा विवाह शेख असलम शेख याच्या सोबत २०२२ मध्ये झाला होता. तेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी ८० हजार पैकी ३० हजार रुपये हुंडा दिला होता. दोन महिने दोघांचा संसार चांगल्या प्रकारे सुरु होता. नंतर मात्र त्यांच्यात वाद होऊ लागले. हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता.
दरम्यान, सासरच्या मंडळींनी तिला चटके देऊन तिचा खून केला. त्यानंतर फोन करून तुमची मुलगी बेशुद्ध होऊन मरण पावली आहे अशी माहिती दिली. यामुळे त्यांना मोठा धक्काच बसला. नातेवाईकांना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या.
हुंड्यासाठी माझ्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत तपास सुरू आहे. सबा बेगम शेख महेबूब असे या मृतक विवाहितेचे नाव आहे. सध्या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, हुंड्यासाठी विवाहितेचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. राहिलेले पैसे दिले नाहीत म्हणून हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पोलीस तपास करत आहेत.