नारायण राणेंची सभा उधळली, ठाकरेंच्या तीन लोकसभा उमेदवारांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

२००५ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सामनाच्या कार्यालयासमोर घेतलेली सभा शिवसैनिकांनी उधळवून लावली होती. या सभेत मोठा राडा झाला होता. यामध्ये अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते. याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं शिवसेनेच्या २८ नेत्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

यामध्ये अरविंद सावंत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह 28 शिवसैनिकांचा समावेश आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असून आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्यानं सर्वांची निर्दोष मुक्तता केली. यामुळे या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या सभेत शिवसैनिकांनी गोंधळ घालण्याचा आणि ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला होता. यामध्ये अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. यामध्ये शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई , विनायक राऊत, अनिल परब, सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, यांच्यासह एकूण 47 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तेव्हापासून याबाबत सुनावणी सुरू होती. दरम्यान, अंतर्गत मतभेदामुळे नारायण राणेंनी 18 वर्षांपूर्वी शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. तेव्हा शिवसैनिक आक्रमक झाले होते.

राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते. यामुळे याठिकाणी मोठा गोंधळ झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. यामुळे अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, यामध्ये 28 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच शिवसेना नेते दत्तात्रय नलावडे यांचे खटला प्रलंबित असताना निधन झाल्याने त्याचे नाव या खटल्यातून वगळण्यात आले होते. या नेत्यांना सध्या दिलासा मिळाला आहे.