Nashik news : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे ड्रग्ज माफियांविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ते म्हणाले, ड्रग्जप्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचा कागदच पोलिस सूत्रांनी मला दिला आहे. एका आमदाराला महिन्याला १६ लाखांचा हप्ता मिळतो, अमली पदार्थांच्या व्यापारातून सहा आमदारांना हप्ते जात होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
त्यांची नावे लवकरच बाहेर येतील. ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा मित्रपरिवार विधानसभेपर्यंत आहे. या रॅकेटमध्ये आमदार, मंत्री आणि पोलिसदेखील आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल, असेही राऊत म्हणाले.
या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली आहे. ललित पाटील हा ड्रग्ज प्रकरणातील हिमनगाचे टोक आहे. ड्रग्ज रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे. रॅकेट चालविण्यासाठी पोलिसांसह आमदार हप्ते घेत होते. या रॅकेटमध्ये आमदार सहभागी आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







