बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सतत चर्चेत आहेत. एनडीएचे सरकार स्थापन करण्यात ते किंगमेकर ठरले. ते नेमकं कोणाला पाठिंबा देणार यावर सगळं गणित अवलंबून होतं. आता सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे.
याचे कारण असे की, तेजस्वी यादव यांच्या मते एनडीए सरकार जास्त काळ चालणार नाही, सरकार मित्रपक्षांच्या आधारावर उभे आहे. तेजस्वी यादव यांना वाटते सातत्याने एनडीएला जर टीकेवर धरले तर नितीश कुमार टीकेला कटांळून एनडीएची साथ सोडतील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत तेजस्वी यादव म्हणाले, एनडीएमध्ये जेडीयूला अपमानस्पद वागणूक मिळते, अशी तक्रार तेजस्वी यादव यांनी केली आहे. मोदी सरकारमध्ये जेडीयूला कमी महत्त्वाची खाती दिलीत असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.
नितीश कुमारांचा राजकीय इतिहास पाहता ते नेहमी राजकीय भूमिका बदलत असतात. नितीश कुमारांचे असे शांत राहणे म्हणजे काहीतरी कुटील डाव शिजतोय, असे विरोधकांना वाटत आहे. यामुळे लवकरच याचा उद्रेक होईल. नितीश कुमारांनी दोन वेळा मोदींचे चरण स्पर्श केले तीच विरोधकांना नितीश कुमारांची कमजोरी वाटते.
पण विरोधकांना याची सुद्धा कल्पना आहे की नितीश कुमार जे करतात त्यांचा अंतरात्मा आवाज ऐकून करतात. दुसरीकडे नितीशकुमार यांना विरोधकांचा डाव चांगलाच कळलाय त्यांनी सुद्धा विरोधकांकडे दुर्लक्ष केले असे दिसते. नितीश कुमारांना सत्तेची चावी चांगलीच कळलेली दिसते.
त्यांना माहिती आहे इंडिया आघाडीने जरी सोबत घेतले तरी सत्तेत येणे पंतप्रधानपद मिळवणे दिसते तितके सोपे नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाला पसंती देत राज्याचा कारभार चालवणे पसंत केले आहे. सध्या नितीश कुमारांकडे १२ खासदार आहेत त्यामुळे इंडिया आघाडीत जावून नितीश कुमारांना सत्ता मिळणार नाही याचा त्यांना अंदाज होता.
नितीश कुमार यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे त्यांना कधीच कोणीही काहीही बोलले याचा फार फरक पडत नाही. राजकरणात अनेकदा नितीश कुमारांनी स्वत:च्या फायद्यासाठी राजकीय भूमिका बदलेली पाहायला मिळते. भाजपलासुद्धा नितीश कुमारांनी अनेकदा विविध मुद्द्यावरुन घेरले आहे.