छत्तीसगडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारी जोरात सुरू आहे. सूरजपूर जिल्ह्यातील एक वार्ड लोकांसाठी रहस्यमय तर उमेदवारांसाठी चिंता वाढवणारा ठरला आहे. गेल्या २५ वर्षांपासून या वार्डात जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून आला, त्याचा रहस्यमय मृत्यू झाला आहे, असे म्हटले जाते.
हा वार्ड यंदा ओबीसी वर्गासाठी राखीव आहे आणि त्याचे नाव मौलाना आझाद वार्ड क्रमांक-२ आहे. या वार्डातून कोणताही उमेदवार निवडणूक लढवण्यास तयार नाही. गेल्या २५ वर्षांपासून येथे निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाचा मृत्यू कशातरी झालेला आहे. नगरपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत हा वार्ड रहस्यमयच राहिला आहे.
या वार्डातून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. असे म्हणतात की, मौलाना आझाद वार्डात जर पुरुष नगरसेवक झाला, तर त्याला कार्यकाळ पूर्ण करता येत नाही. तो एखाद्या आजाराने किंवा अपघाताने मरण पावतो.
महिला उमेदवार निवडून आली, तर तिच्या पतीचा मृत्यू होतो, असेही म्हणतात. मागील एक वर्षापासून या वार्डाला नगरसेवक नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा उमेदवार येथे निवडणूक लढवू इच्छित नाही.
मागील निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक जियाजुल हक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. स्थानिक लोकांच्या मते, या वार्डातील एकूण पाच नगरसेवकांचा मृत्यू झालेला आहे. काही लोक हे फक्त अफवा मानतात, परंतु उमेदवारांमध्ये भीती आहे.
संपूर्ण जिल्ह्यात या वार्डाची चर्चा आहे. पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यामुळे या वार्डाची चर्चा वाढली आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस यापैकी कोणाला उमेदवारी देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.