ठाकरेंना मोठा धक्का! एकामागून एक नेत्यांनी शिवबंधन सोडलं, नाशकातील बडा नेता शिंदे गटात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना आगामी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

पुणे आणि मुंबईसह अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गट) निवड केली आहे. प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी नगरसेवक दीपक साहेबराव खैरे, माजी स्थायी समिती सभापती दत्ता बाबाराव जाधव, माजी नगरसेवक प्रशांत बाळू गायकवाड, महिला अंबिका बँकेच्या अध्यक्ष शोभना चव्हाण, आणि माजी नगरसेवक दिलीप नानभाऊ सातपुते यांचा समावेश आहे.

यावेळी शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, आणि शहरप्रमुख अजित दळवी उपस्थित होते.

घोडेले यांचा संभाव्य प्रवेश; खैरे यांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा शिंदे गटात संभाव्य प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घोडेले यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “घोडेले बऱ्याच दिवसांपासून पक्षबदलाच्या विचारात होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला महापौर पद दिले. इतके मिळूनही त्यांनी गद्दारी केली. त्यांच्या समाजातील लोकही या निर्णयाबद्दल नाराज आहेत.”

“पैशासाठी पक्ष बदल अयोग्य” – खैरे

चंद्रकांत खैरे यांनी पुढे म्हटले, “ज्यांनी पक्ष सोडला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही. संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे योग्य नाही. पैशासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी पक्ष बदलणे योग्य ठरत नाही.”

शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढतेय

या प्रवेशामुळे शिंदे गटाने आपली ताकद आणखी मजबूत केली असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे काम अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर, ठाकरे गटामध्ये निर्माण झालेली नाराजी आणि त्यावर नेतृत्व काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.