ऑनलाइन केक मागवला, खाल्ल्यावर मुलीचा मृत्यू, दुकानाची माहिती घेतल्यावर भयंकर माहिती आली समोर

पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत संबंधित बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सगळेच हादरले असून नेमकं कशामुळे ही घटना घडली याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, पटियालाच्या अमन नगर परिसरात राहणाऱ्या मानवीचा वाढदिवस होता. या दिवशी तिची आई काजलने झोमॅटोवरुन कान्हा फर्ममधून केक मागवला होता. वाढदिवसही साजरा झाला. यामध्ये सर्वांनी केक खाल्ला यानंतर मानवीची तब्येत बिघडली. नंतर घरातील इतर सदस्यांनाही उलट्या होऊ लागल्या.

यामध्ये मानवीची तब्येत अधिक बिघडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिचे निधन झाले. मानवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी केक पाठवणाऱ्या त्या कान्हा फर्मविरोधात तक्रार दाखल केली. मात्र धक्कादायक प्रकार यावेळी समोर आला.

घटनेनंतर पोलिसांनी याची चौकशी केली तेव्हा समोर आले की तिथे त्या नावाचे कोणतेच दुकान नाही. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले. यामुळे सगळेच हादरले. असे असताना मानवीच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा झोमॅटोवरुन कान्हा फर्ममधून केक मागवला. हा केकही आला.

यावेळी मात्र केकची डिलिव्हरी देणाऱ्या एजंटला त्यांनी पकडले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर बेकरीचा मालक फरार असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.