आमचा स्वाभिमान आमचे विमान! इंदापुरात निकालाआधीच गुलाल, हर्षवर्धन पाटलांचं काय ठरलं?

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. हा बॅनर हर्षवर्धन पाटील समर्थकांनी लावला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इंदापूरच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, विधानसभा 2024 असे या बॅनरवर म्हटले आहे. यामुळे आता तिकीट वाटपात विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच हे तिकीट जाणार हे निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे.

इंदापूरच्या राजकारणात गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत बघायला मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा अगदी निसटता विजय झाला होता.

त्याआधी दोन वेळा हर्षवर्धन पाटील हे विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा आता सुरू आहे.

या जागेवर सध्या दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. याठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा देखील दावा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांना उमेदवार मिळाली नाही. यामुळे आता त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बॅनरबाजी केली का? असादेखील प्रश्न आता उपस्थित होतोय. आता आगामी काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. शरद पवार देखील याठिकाणी उमेदवार देणार आहेत. यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होईल.