Palghar news : क्रिकेट सामना बघताना झाला वाद, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

Palghar news : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याठिकाणी क्रिकेटचा सामना बघताना वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. बेदम मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यामुळे मोठी खळबळ उडाली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना बघताना हा वाद झाला होता. प्रवीण राठोड (वय 37) असे या घटनेत मृत तरुणाचे नाव आहे. मारहाण करून आरोपी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती अशी की, बोईसर येथील चित्रालय परिसरात संतोष हेअर सलून हे दुकान आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असताना प्रवीण राठोड आणि आरोपी मनोज गिरी व प्रतिक गिरी हे दोघे केस कापण्यासाठी आले होते.

ते सगळे मोबाईलवर सामना बघत होते. अचानक प्रवीण राठोड व इतर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मारहाण देखील झाली. आरोपींनी आपल्या मित्रांना बोलवून सलूनमधील खुर्चीचे हेडरेस्ट काढून प्रवीण राठोड याच्या डोक्यावर वार करत जबर मारहाण केली.

यामध्ये उपचारादरम्यान प्रवीण राठोड याचा मृत्यू झाला आहे. आरोपी मनोज गिरी, प्रतीक गिरी आणि दोन अनोळखी इसमांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. यानंतर आरोपी फरार झाले असून बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.