Palghar News : सध्या पालघरच्या मेंढवन घाटात कार आणि टँकरच्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी लगेच पोलीस दाखल झाले.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. हा माहामार्ग तयार झाल्यापासून शेकडो जणांनी आपले प्राण याठिकाणी गमावले आहे. या अपघातातील लोकं हे पुण्याचे होते. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार मेंढवन घाटातील धोकादायक वळणावरुन समोरुन येणाऱ्या टँकरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण भुगाच झाला आहे.
यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले. यामध्ये हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) मिलिंद वैद (वय 43) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या धोकादायक वळणावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना नसल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे.
हा अपघात खूपच भीषण होता. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी याठिकाणी येऊन गर्दी कमी केली. तसेच जखमींना देखील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, आतापर्यंत याच जागेवर शेकडो लोकांनी प्राण गमावेलत. मात्र अजूनही याठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.