विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार! ‘हा’ नेता करतोय बारामतीत अजित पवारांविरोधात तयारी…

राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी अनेक नेते फुटल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे.

महाराष्ट्रात सगळ्यांच लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आहे. सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या कन्या, तर सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी आहेत.

बारामतीमधील ही बिग फाईट म्हणजे वर्चस्वाची लढाई आहे. लोकसभेनंतर विधानसभेला सुद्धा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो. विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळू शकतं. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याची तयारी सुद्धा सुरु झाली आहे. अजित पवार यांना विधानसभेला युगेंद्र पवार आव्हान देऊ शकतात. म्हणजे आता जशी अजित पवार यांची त्यांच्या काकांबरोबर लढाई सुरु आहे, तसच विधानसभेला पुतण्याच अजित पवारांना आव्हान देऊ शकतो. युगेंद्र पवार अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांचा पुत्र आहे.

लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. युगेंद्र पवार आठवड्याचे चार दिवस बारामतीमध्येच थांबणार असल्याची माहिती आहे. दर मंगळवारी शरद पवार गटाच्या कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत.

युगेंद्र पवार आधीपासूनच बारामतीमध्ये सामाजित कार्यात सक्रीय आहेत. आता विधानसभेच्या माध्यमातून ते राजकारणात उतरू शकतात. शरद पवार यांचा आणखी एक नातू रोहित पवार आधीपासूनच राजकारणात सक्रीय आहे. रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवार आणि रोहित पवार दोघांनी प्रचाराचा मोर्चा संभाळला होता.

आता येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे अजित पवार यांना आगामी काळातील कोणत्याही निवडणूका सोप्या जाणार नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत काय होणार यावर सगळं गणित अवलंबून आहे.