तरुण हत्या करुन घरी गेला, मटण पार्टीही केली, संतापलेल्या नागरिकांनी थेट…; नागपूर हादरलं

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करणाऱ्या दोन आरोपींना नागरिकांनीच थेट शिक्षा दिली आहे. रामा मंगल बाहेश्वर यांचा जीव घेणाऱ्या तरुणांच्या घरावर संतप्त नागरिकांनी हल्ला केला आहे.

अमन चौहान (२३) आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या घरावर बाहेश्वर यांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी हल्ला केला आहे. त्यांनी त्या दोघांची घरे जमीनदोस्त केली आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेमुळे बेलतरोडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आता कोणताही वाद निर्माण होऊ नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तही करण्यात आला आहे. याप्रकरणी १०० पेक्षा जास्त नागरिकांवर तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. संदीप वाघमारे, सदेलाल पटेल, शंकर पटेल, आनंद चौरे, रवी कावरे, कमलकिशोर बाहेश्वर, जितलाल पटेल, अनिल पटेल, राहूल नितोने, अशोक बागूल, टोपराम तुळसीकर, सुनील नागेडवर, आशिष आचरे, प्रल्हाद पटेल , धनेंद्र गेडाम, कृष्णा शाहू, मुकेश बाहेश्वर या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

अमन हा तरुण परिसरातील नागरिकांना नेहमी धमक्या देत असायचा. ८ ऑगस्टला त्याने आणि त्याच्या एका १४ वर्षीय साथीदाराने रामा यांची हत्या केली होती. हत्या करुन त्याने घरी येऊन मटण पार्टी सुद्धा केली होती. त्यामुळे नागरिक खुप संतापले होते.

अशात बुधवारी रात्री नागरिकांनी अमनचे घर गाठले. त्यावेळी घरी कोणीच नव्हते. त्यामुळे नागरिकांनी थेट घरावरच हल्ला केला. त्यांनी घराची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या घरावरही हल्ला केला. तिथे तो नसल्यामुळे लोकांनी त्याच्या भावाला आणि वडिलांना मारहाण केली.

पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी लोकांच्या तावडीतून भावाची आणि वडिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या १८ जणांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमन हा मंगळवारपासूनच परिसरातील लोकांशी वाद घालत होता. पण पोलिस त्याच्यावर कारवाई करत नव्हते. अशात ८ ऑगस्टला त्याने शुल्लक कारणावरुन रामा यांची हत्या केली. त्यानंतर घरी जाऊन पार्टीही केली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी असे पाऊल उचलले आहे. त्यानंतर आता त्या भागात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.