भररस्त्यात सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला तरुणांनी केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

मराठीतील काही अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावरही खुप सक्रीय असते.

चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असणारी सई ताम्हणकर आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सईच्या ड्रायव्हरला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात चारजणांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. सद्दाम असे त्या ड्रायव्हरचे नाव आहे. सईचा ड्रायव्हर हा मालवणी परिसरात जात असताना ही घटना घडली आहे. त्यावेळी सईच्या ड्रायव्हरमध्ये आणि काही तरुणांमध्ये वाद झाला होता. १३ ऑगस्टला रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली होती.

ड्रायव्हर गाडी घेऊन जात असताना काही तरुण आडव्या तिडव्या पद्धतीने गाडी चालवत होते. त्यामुळे रस्त्यावर गोंधळ निर्माण होत होता. सईच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवत त्यांना गाडी बाजूला करा असे सांगितले.

त्यावेळी त्या ड्रायव्हरला गाडीच्या खाली उतरवून त्या चार तरुणांनी मारहाण केली आहे. त्या तरुणांनी बेल्ट आणि बांबूने त्या ड्रायव्हरला मारले आहे. तसेच त्याला सोडवण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनाही त्यांनी मारहाण केली.

मारहाणीमुळे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे तिघांनाही कांदिवली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जेव्हा रुग्णालयातून ड्रायव्हरला सोडण्यात आले. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात धाव घेत त्या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.