भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय संघ आणि विंडिजचा संघ यांच्यात पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यामधील तिसरा सामना मंगळवारी पार पडला आहे. हा सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताच्या हातातून ही मालिका जाणार असे वाटत होते. पण तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत पुनरागनम केले आहे.
अशात सामना जिंकण्यापेक्षा कर्णधार हार्दिक पांड्याच्या एका गोष्टीची चर्चा जास्त होत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी केली तर हार्दिक पांड्याने १५ चेंडूत २० धावा केल्या.
हार्दिक पांड्याने षटकार मारुन सामना जिंकवला होता. असे असले तरी एका कारणामुळे त्याला ट्रोल करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या हा स्वार्थी असल्याचे म्हटले जात आहे. धोनी-विराटसोबत राहूनही तो काही शिकला नाही, अशी टीकाही काही लोकांनी केली आहे.
झाले असे की भारतीय संघाला १६० धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल हे पुन्हा अपयशी ठरले. त्यानंतर सुर्यकुमार यादवने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ८३ धावा केल्या. पण तोही बाद झाला.
सुर्यकुमार यादवसोबत तिलक वर्माही खुप चांगला खेळत होता. सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला. त्यावेळी तिलक वर्माही अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. हार्दिक पांड्याने मैदानात उतरताच आक्रमक खेळी खेळायला सुरुवात केली.
१७ व्या षटकाचा पाचवा चेंडू येणार होता. भारतीय संघाला २ धावा लागत होत्या. हार्दिक पांड्या फलंदाजी करत होता. तर तिलक वर्मा हा नॉन स्ट्राईकर एंडला होता. त्यावेळी हार्दिक पांड्या दोन चेंडू डॉट जाऊ देईल आणि तिलक वर्माला अर्धशतक पुर्ण करुन देईल असे सर्वांना वाटत होते.
अशात चौथ्या चेंडूला हार्दिक पांड्याने षटकार मारुन सामना जिंकवला. त्यामुळे सामना भारताने जिंकला पण तिलम वर्माला मात्र ४९ धावा करुनही अर्धशतक पुर्ण करता आले नाही. भारताकडे सामना जिंकण्यासाठी पुरेसे चेंडू शिल्लक असतानाही हार्दिक पांड्याने असे केल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
भारतीय संघ जिंकला त्याचा आनंद तिलकच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण त्याच्या मनात अर्धशतक हुकल्याची खंत असावी असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे असेच काहीसे धोनी आणि विराटसोबतही घडले होते. पण त्यांनी आपल्या सोबतच्या फलंदाजांना संधी दिली होती.
२०१४ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला ७ चेंडूत १ धाव हवी होती. त्यावेळी धोनीने १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एकही धाव न घेता विराटला स्ट्राईक दिली होती. कारण विराट कोहलीने हा सामना जिंकवावा असे धोनीला वाटत होते.
तसेच आयपीएलमध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यात विराटनेही असेच काहीसे केले होते. ख्रिस गेलला शतक पुर्ण करण्यासाठी १ धाव लागत होती. त्यावेळी आरसीबीच्या संघाला जिंकण्यासाठी २ धावांची गरज होती. पण विराटने चेंडू डॉट जाऊ दिला आणि ख्रिस गेलला स्ट्राईक दिली. त्यानंतर ख्रिस गेलने सामना जिंकवत शतक पुर्ण केले होते.