शुभ मुहूर्त काढून टाकला दरोडा, १ कोटीही मिळाले पण अद्दल घडलीच; वाचा बारामतीत नक्की काय घडलं?

कोणतेही शुभ काम करायचे असल्यास मुहूर्त काढायला हवा असे नेहमी सांगितले जाते. त्यानुसार लोक ज्योतिषांकडे जाऊन लग्न, वाहन खरेदी किंवा आणखी कोणत्या कामासाठी शुभ मुहूर्त काढून ते करतात. अशात बारामतीतून मात्र एक विचित्रच घटना समोर आली आहे.

बारामतीत काही चोरट्यांनी थेट दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढल्याची घटना समोर आली आहे. पण त्या चोरीनंतर ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

बारामतीमधील देवकाते नगरमध्ये ही घटना घडली आहे. त्या सहा जणांनी मिळून एका महिलेच्या घरी दरोडा टाकला होता. त्यावेळी त्यांनी तिला मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी १ कोटी ७ लाख रुपयांचा दरोडा टाकला होता.

दरोड्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सचिन जगधणे, रायबा चव्हाण, रविंद्र भोसले, दिपक जाधव, नितीन मोरे, रामचंद्र चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सागर गोफणे त्यांची पत्नी तृप्ती आणि दोन मुलांसह देवकाते नगर परिसरामध्ये राहतात. २१ एप्रिलला सागर हे तिरुपती बालाजीला दर्शनसाठी गेले होते. त्याचदिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडेखोर तिथे आले. त्यांनी तृप्ती यांना मारहाण केली. तसेच त्यांचे हातपाय बांधून घरात दरोडा टाकला.

चोरट्यांनी यावेळी ९५ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजारांचा मोबाईल या सगळ्यांची चोरी केली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. महिलेने तातडीने याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली.

तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पथक नेमले होते. पोलिसांनी पकडू नये म्हणून चोरट्यांनी एकही पुरावा ठेवला नव्हता. पण तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सागर गोफणे हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा असेल याची जाणीव चोरट्यांना होती. त्यामुळे सचिन जगधणे याने ज्योतिष रामचंद्र चव्हाणकडे जाऊन दरोड्याचा शुभ मुहूर्ता काढला आणि त्यानुसार दरोडा टाकला. पण पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतले आहे.