ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात आणि पोलीसमध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपले या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मनीष उतेकर असे या तरुणाचे नाव आहे. मनीष उतेकर हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणार आहे. तो आर्मी भरती पोलीस भरतीसाठी परीक्षा देत होता. यासाठीचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्याने धक्कादायक माहिती दिली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आईच्या मोबाईलवर एक नोट पाठवली. यामध्ये मनीष म्हणाला की, गटारीच्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्राने मद्यपान केले होते. मद्यपान करून वाहन चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवले.
त्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करुन कोर्टात जाण्यास सांगितले. मात्र दोन दिवस पोलिसांची माफी मागून दंड भरतो असे सांगितले तरी त्यांनी करियर बरबाद करणार असल्याची धमकी दिली असल्याचा आरोप मनीषने नोटमध्ये केला आहे.
कोर्टात गेलो तर आपले करियर संपून जाईल. या नैराश्यातून मनीष उतेकर याने आपल्या राहत्या घरात आईच्या साडीच्या साहाय्याने आत्महत्या केली. मनीषने काही पोलीस कर्मचाऱ्यांची नाव लिहलेली असून त्यांनी करियर संपवण्याची धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे.
त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी मनीषच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु असून चौकशी नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.