Parbhani News: परभणी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांच्या दुचाकीला भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या अपघातात गवारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात पोखर्णी-पाथरी महामार्गावर भारसवाडा येथे घडला आहे. गवारे हे रविवारी सायंकाळी कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गवारे यांनी दुचाकीचा वेग कमी केला होता. मात्र, भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामुळे गवारे यांची दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली. यातच स्कॉर्पिओने देखील पेट घेतला.
गाडीतील चालक व प्रवाशी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. गवारे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गवारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. गवारे हे 2019 पासून सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते त्यांच्या कर्तृत्वासाठी परिसरात प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे. प्रभाकर गवारे यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भरधाव वेगात असलेल्या कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.