सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी शरद पवारांची भेट का घेतली? पटेलांनी सांगीतले खरे कारण

रविवारीच अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवारांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असे असताना आता पुन्हा अजित पवार आणि ३० बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

या आमदारांनी तासभर शरद पवारांशी चर्चा केली आहे. सलग दुसऱ्यादिवशी अजित पवारांनी आणि बंडखोर नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. या भेटीनंतर अजित पवार यांच्या गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी रविवारीही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. काल काही आमदारांना शरद पवारांचं दर्शन घेता आलं नव्हतं. त्यामुळे आज ते सर्व आमदार शरद पवारांना भेटण्यासाठी आले होते, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

काल फक्त मंत्री भेटीसाठी आले होते. अजित पवार आणि विधीमंडळाचे काही नेते शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. रविवार असल्याने अनेक आमदार हे आपआपल्या मतदार संघात होते. आज विधीमंडळाचे अधिवेशन असल्यामुळे अनेक आमदार हे उपस्थित होते. त्यामुळे ते शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

आता सर्व आमदारांनी आशीर्वाद घेतला आहे. पक्ष एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच याबाबत आम्ही शरद पवारांना विनंतीही केली आहे. शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. पण त्यांच्या मनात नक्की काय आहे? याची कल्पना मला नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

तसेच रविवारी जेव्हा भेट झाली होती, तेव्हाही प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, आम्ही शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो होतो. आम्ही त्यांना यातून मार्ग काढावा अशी विनंती केली आहे. तसेच यावर योग्य विचार करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं असं आम्ही त्यांना सांगितलं आहे.