Pune crime : पुण्याच्या बुधवार पेठेत खळबळ! भररस्त्यात तरुणाची गळा चिरुन हत्या, धक्कादायक कारण आलं समोर…

Pune crime : सध्या पुण्यातली गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोयता गँग, धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुढे येत आहेत. अशातच आता बुधवार पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याठिकाणी महिलेच्या पहिल्या पतीने, तिच्या दुसऱ्या पतीचा वस्तऱ्याने गळा चिरून निर्घुण खून केला आहे. नईम शेख असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून कलाम उर्फ रूबेल शेख याला ताब्यात घेतले आहे.

क्रांती चौकाच्या बाजूला नवीन सागर इमारतीजवळ ही घटना घडली आहे. संबंधित महिला बुधवार पेठेत वास्तव्यास आहे. कलाम शेख हा तिचा पहिला पती आहे. तर नईम शेख हा तिचा दुसरा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी नईम याने महिलेसोबत लग्न केले आहे.

तेव्हापासून ते एकत्र राहात होते. हा प्रकार कलाम याला समजला होता. त्याच्या मनात नईमबाबत राग होता. यामुळेच हे कृत्य करण्यात आले आहे. त्याच रागातून त्याने सायंकाळी वस्तऱ्याने नईमचा गळा चिरून निर्घुण खेन केला. नईम लहान मुलाला घेऊन इमारतीच्या खाली फिरत होता. त्या वेळी कलाम हा तिथे आला.

त्याने खिशातून वस्तरा काढून नईमच्या गळ्यावर फिरवला. जखमी नईमला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेनंतर कलाम हा फरार झाला होता. तो रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या घटनेमुळे बुधवार पेठे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याठिकाणी मोठी गर्दी देखील झाली होती. घटनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले होते. याठिकाणी जवळच पोलीस स्टेशन देखील आहे.