Pune news : मोठी बातमी! पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात! अपघातात अनेक विद्यार्थी जखमी…

Pune news : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता पुण्यामध्ये एका स्कूल बसचा अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. यामुळे मोठी पळापळ झाली. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बस किती वेगात होती याचा अंदाज सहज बांधता येत आहे. या सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगाने स्कूल बस येऊन धडकताना दिसते.

या व्हिडीओमध्ये बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते. अपघातानंतर बसमधील मुलांचा आरडाओरड आणि किंकाळ्याही ऐकू येत होत्या. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले तसेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. मुलांनी मोठा कालवा केल्याने त्यांना शांत होण्यास सांगितले.

दरम्यान, हा अपघात ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे झाला. सकाळीच्या वेळी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सुदैवाने यामध्ये कोण गंभीर जखमी झाले नाही.

दरम्यान, मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते. मात्र पुणे आरटीओचं अशा बसेसवर कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रकारे अनेक बसेस सध्या कार्यरत आहेत.