मोठी बातमी! ईव्हीएमविरोधात राहूल गांधी आक्रमक, महाराष्ट्रातील ‘या’ गावातून छेडणार मोठे आंदोलन

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत ईव्हीएमच्या विरोधात निर्माण झालेला आक्रोश आता चांगलाच पेट घेत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला तातडीने पुनर्मतदानाचा आदेश देण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा आणि त्यानंतरही न्याय मिळाला नाही तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मारकडवाडीहून लॉंग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे.

ईव्हीएम विरोधी संयुक्त कृती समितीने सोलापुरात आंदोलन केले, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पराभूत उमेदवार सहभागी झाले होते. या आंदोलनात उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जानकर म्हणाले, “ईव्हीएम विरोधात लागलेली ठिणगी जर मोठी झाली, तर ती थांबवणे अवघड होईल. मारकडवाडीतून चंपारणप्रमाणे लॉंग मार्च सुरू होईल.” यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि यशपाल भिंगे यांनी मारकडवाडीतील माती राहुल गांधींच्या हस्ते गांधीजींच्या पुतळ्यासमोर अर्पण करण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला.

ईव्हीएमच्या तांत्रिक त्रुटींवर बोलताना जानकर यांनी व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांवरही संशय व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, व्हीव्हीपॅटमध्ये सुरुवातीला दोन्ही चिन्हे छापली जातात, पण नंतर विरोधी पक्षाचे चिन्ह पुसले जाते आणि फक्त कमळ चिन्हाची मते मोजली जातात.

जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील 91 गावांतील लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केल्याचा उल्लेख केला. तसेच, मारकडवाडीत प्रशासनाने फोर्स आणि सीआरपीएफच्या तीन तुकड्या पाठवून दडपशाही केली आणि विरोधकांवर गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप केला. “आम्ही काय राष्ट्रद्रोह केला होता का?” असा सवाल जानकर यांनी उपस्थित केला.

जानकर यांच्या म्हणण्यानुसार, मारकडवाडीतील ईव्हीएम विरोधात केलेल्या सॅम्पल चाचणीला जवळपास 18-19 कोटी लोकांनी पाठिंबा दिला. त्यांनी यावरून जनतेतील नाराजी आणि उद्रेक स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

आता निवडणूक आयोग या प्रकरणावर काय निर्णय घेतो आणि ईव्हीएमविरोधी या आक्रोशाला कसा प्रतिसाद देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.