देशाचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे आज निधन झाले. यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोशल मीडियावर सगळीकडे टाटा यांचेच पोस्टर दिसून येत आहेत. सर्वांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अनेक कलाकार मंडळीनी टाटा यांना पोस्टच्या माध्यमातून निरोप दिला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्या पोस्टने लक्ष वेधले. सिमी आणि रतन टाटा यांचे खूप खास नाते होते आणि हे नाते अभिनेत्रीने अनेकदा मान्यही केले होते. यामुळे या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकेकाळी रतन टाटा यांच्या प्रेयसी असणाऱ्या सिमी यांनी लिहिले आहे की, ते म्हणतायंत तू निघून गेला आहेस. तुझ्या जाण्याने झालेले नुकसान सहन करणे खूप कठीण आहे. खूपच कठीण. अलविदा मित्रा. सिमी यांनी त्यांचा आणि रतन टाटा यांचा एक फोटोही या पोस्टसोबत शेअर केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.
सिमी आणि रतन टाटा अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा सिमी यांनी या नात्याविषयी माहिती देखील दिली होती. नंतर ते वेगळे झाले. ते आयुष्यभर एकमेकांचे मित्र म्हणून राहिले. त्यांनी मैत्रीमध्ये कधीच दुरावा आणला नाही. यामुळे आयुष्यभर त्यांचे चांगले संबंध राहिले.
रतन टाटा हे मुंबईतील माझे पहिले मित्र होते. आम्ही दोघे नुकतेच परदेशातून परतलो होतो, दोघेही पुढे सामोरे जावे लागणाऱ्या अज्ञात जगाच्या उंबरठ्यावर उभे होतो. अनेक दशकानंतरही त्याचे व्यक्तीमत्व बदलले नाही. तो अजूनही लाजाळू आहे, संयमशील आहे, पण नेहमी स्पष्ट आणि दयाळू आहे, असे सिमी त्यांनी म्हटले होते.
तसेच कामाच्या ठिकाणी तो कॉर्पोरेट दुरदृष्टी असणारा आहे, तर ऑफिसपासून दूर असताना एक एकांतवासी आहे. सिमी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांचा लोकप्रिय शो Rendezvous with Simi Garewal साठी लिहिलेल्या वर्णनात असे म्हणले होते. दरम्यान, आज त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे.