शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. या दोन्ही फुटींमुळे महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला होता. पण आता ते पुन्हा मजबूत होताना दिसत आहे.
इतकंच नाही, तर महाविकास आघाडी महायुतीला रोखण्यासाठी प्लॅनही बनवताना दिसून येत आहे. पण महायुती असो वा महाविकास आघाडी चर्चेचा विषय असतो तो म्हणजे जागा वाटपाचा. आता जागा वाटपासाठी महाविकास आघाडीने एक सुत्र तयार केलं आहे.
येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहे. तसेच जागेचा हट्ट धरायचा नाही, जो जिंकेन त्याची जागा या सुत्राने महाविकास आघाडी लढणार असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दोन्ही बड्या नेत्यांनी बंड केली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकदवर असल्याचे दिसून येत होतं.
असे असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी थेट फॉर्म्युलाच सांगितला आहे. जेव्हा इंडियाच्या आघाडीच्या जागा वाटपाचा विषय होईल तेव्हा जो उमेदवार पास होईल त्यालाच तिकीट मिळेल, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. समसमान १६-१६-१६ वाटप होणार की, मोठा भाऊ, छोटा भाऊ म्हणत कमी जास्त जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळाला होता. त्यामुळे त्याच्यावर महाविकास आघाडी काय उपाय काढणार? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, बारामतीत सुप्रिया सुळे यांना साथ द्या अशा सुचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बारामतील ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मतदार संघातील ताकदीचा आढावा घेतला आहे.