कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्… चौकशीतून सरपंच देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम आला समोर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, आरोपींनी संतोष देशमुख यांना कत्तीने, फायटरने, आणि 41 इंचाच्या लोखंडी रॉडने मारहाण केली.

या लोखंडी रॉडला करदोड्याने मूठ तयार केली होती. संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करताना त्यांच्या शरीरावर अनेक फटके मारण्यात आले. धस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मारहाणीनंतर संतोष देशमुख तहानेने व्याकूळ झाले होते. पाणी मागितल्यानंतर आरोपींनी त्यांच्या तोंडात लघवी केली.

त्यामुळे देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जामीन मिळता कामा नये, त्यांना फाशी झाली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. धस यांनी इशारा दिला की, वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार सुटले तर भविष्यात त्यांची लॉरेन्स बिश्नोईसारखी दहशत निर्माण होईल.

सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून हत्येचा तपास सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून, त्यातून या क्रूर हत्येची माहिती समोर येत आहे. मारहाणीनंतरही संतोष देशमुख जिवंत होते, त्यामुळे आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आणि सुधीर सांगळे हे पोलीस कोठडीत आहेत, तर कृष्णा आंधळे फरार आहे. तपासात समोर आले की, मारहाणीच्या वेळी आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा पश्चाताप नव्हता.

पोलिसांना डिजिटल पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे तपास अधिक गतीने सुरू आहे. सरपंच देशमुख यांना मारताना चार लोखंडी रॉड, फायटर, कत्ती, आणि लाकडी काठीचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी, पाच मोबाईल, आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत.