Crime News : नवऱ्यासोबत झालं भांडण, बायकोने पेटवून दिले घर! दोघेही डॉक्टर, छत्रपती संभाजीनगरातील खळबळजनक घटना

Crime News : पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने घराला आग लावून दिली. ही घटना सोमवारी (29 जानेवारी) सकाळी एपीआय कॉर्नरजवळ घडली. दोघेही पती-पत्नी डॉक्टर आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची तक्रार डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (वय 40) यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, त्यांचे लग्न 2019 मध्ये झाले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. विनिता या सतत पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करता होती.

28 जानेवारीला रात्री 9 वाजता त्यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढत गेला की त्यांच्या आरडाओरड्यामुळे शेजारील लोकही धावून आले. शेजारी मनोज मर्दा यांनी दोघांची समजूत काढली. तरीही मध्यरात्री दीड पर्यंत दोघांत धुसफूस सुरूच होती. त्यामुळे मर्दा यांनी पुढाकार घेत विनिता यांना गोविंद काम करत असलेल्या रुग्णालयात सोडून आले होते.

सकाळी सहापर्यंत तिथे थांबून विनिता घरी आल्या. आल्या आल्या त्यांनी जोरजोरात दार वाजवणे सुरू केले. डॉ. गोविंद यांनी दरवाजा उघडला, त्यानंतर विनिता पुन्हा जोरजोरात भांडू लागल्या. त्यामुळे शेजारी जमू लागले. वाद वाढू नये म्हणून डॉ. गोविंद दरवाजा उघडून खाली आले.

त्यानंतर संतप्त विनिता यांनी घरालाच आग लावून दिली. आगीचे लोळ बाहेर आल्याने शेजाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे घाबरलेल्या डॉ. गोविंद यांनी तातडीने वरच्या मजल्यावर धाव घेतली. विनिता बॅग घेऊन निघून गेल्या.

गोविंद वर जाईपर्यंत घर चोहोबाजूने पेटले होते. अग्निशमन विभागाला सांगण्यात आले. त्यांनी तीन बंबाच्या मदतीने आग विझवली. मात्र तोपर्यंत सोफा, दोन फ्रीज, एसी, टीव्ही, कुलर, कपाट, शोकेस, दरवाजे, घराची कागदपत्रे व डॉ. गोविंद यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे, कपडे जाळून खाक झाले होते. या घटनेचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.