शंभूराज देसाई खोटं बोलले, आमदार थोरवेंनी सांगीतली राड्याची खरी स्टोरी, भुसेंना म्हणाले, तुमच्या घरचं खात नाही…

आज विधानसभेच्या लाॅबीत शिंदे गटातील आमदार भिडल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे सध्या याचे पडसाद उमटले आहेत. दोन्ही आमदार एकमेकांना भिडल्याने मंत्री शंभूराज देसाई आणि भारत गोगावले यांनी मध्यस्थी केली. नंतर आता या वादावर पडदा टाकण्याचे काम सुरू आहे.

असे असताना आता हा वाद झालाच नसल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे. यामुळे शंभूराज देसाई चांगलेच तोंडावर पडले आहेत. तसेच त्यांनी दादा भूसेंवर सडकून टीका केली आहे. मी तुमच्या घरचं खात नसल्याचे म्हणत थोरवे यांनी दादा भूसे नकारात्मक मंत्री असल्याचे म्हटले आहे.

या घटनेनंतर महेंद्र थोरवे म्हणाले, बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. भुसे नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातले काम होत नाही हे विचारले तर मला वेगळे उत्तर मिळाले असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी फोन करूनही आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत.

दरम्यान, माझ्या मतदारसंघातील कामाबाबत खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. यावेळी दादा भुसे चिडले. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे.

दरम्यान, याबाबत शंभूराज देसाई म्हणाले की, त्याठिकाणी त्यांची चर्चा चालू होती आणि चर्चा चालू असताना, त्यांचा आवाज थोडासा वाढला. याच्याबाबत एकमेकांच्या अंगावर गेले, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद-विवाद झाला असे काही झाले नाही.