गेल्या अनेक दिवसांपासूनच्या जागावाटपच्या भिजत घोंगड्यावर महाविकास आघाडीने तोडगा काढला आहे. काल याबाबत एकत्र पत्रकार परिषद देखील झाली. काही उमेदवारांची घोषणा होणे बाकी असताना आता घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी १० जागा सुटल्या असून त्यापैकी ७ उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षाने आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये महत्वाच्या सातारा लोकसभेची जागा आहे.
शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीने जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच आज शरद पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामे ट्वीटमध्ये म्हटले की, तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
चला, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया, असे म्हणत यामध्ये जाहीर उमेदवारांची नावे घोषित केली गेली आहेत. माढ्यातून शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून सर्वात आघाडीवर आहे.
दरम्यान, मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप त्यांची समजूत काढणार की ते शरद पवार यांच्याकडे येणार हे येत्या काही दिवसांमध्येच समजेल.