बंडखोर आमदारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; भाजपसोबत जाण्याबाबत म्हणाले…

अजित पवार आणि त्यांच्या बंडखोर आमदारांचा गट शरद पवार यांच्या भेटीसाठी आला होता. शरद पवार वाय बी चव्हाण सेंटवर असताना कुठलीही कल्पना न देता ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. या नेत्यांनी शरद पवारांशी तासभर चर्चा केली.

शरद पवार आणि बंडखोर आमदारांमध्ये झालेल्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की अजित पवार गटातील नेते शरद पवारांची माफी मागायला आले होते.

तसेच आमदारांनी शरद पवारांना यासर्व गोष्टींवर मार्ग काढत एकत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण शरद पवारांनी त्याच्यावर काहीही भाष्य केलेले नाही, अशी माहिती समोर आली. त्यानंतर आता स्वत: शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मला भाजपसोबत जायचं नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

आपण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत त्यांनी महायुतीत जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी शरद पवारांसमोर युतीत येण्यासाठी प्रस्ताव मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

दरम्यान, शरद पवारांशी भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीत काय झालं हे स्पष्ट केलं आहे. शरद पवारांना भेटताच आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच आम्ही साहेबांना विनंती केली की आमच्या मनात त्यांच्यासाठी खुप आदर आहे. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी योग्य विचार करुन मार्ग काढावा. आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.