शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली होती. पुण्यातील अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर त्यांची भेट झाली होती. राष्ट्रवादीत फुट पडलेली असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या भेटीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसमोर एक प्रस्ताव ठेवला होता. सत्तेत येऊन आपल्याला मार्गदर्शन करावे, असे अजित पवारांनी शरद पवारांना म्हटले होते.
शरद पवारांनी मात्र याला नकार दिला आहे. आपण भाजपसोबत जाणार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व गोष्टी भेटीत झाल्याचे म्हटले जात आहे. अशात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपकडून शरद पवारांना दोन पदांच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. सत्तेत आले तर केंद्रीय कृषी मंत्रिपद आणि निती आयोगाचे अध्यक्षपद अशी ऑफर भाजपकडून अजित पवारांच्या मार्फत शरद पवारांना देण्यात आली आहे. पण शरद पवारांनी ही ऑफर नाकारली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
तसेच भाजपने जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामील करुन घेण्यासाठी ऑफर दिली आहे. अजित पवार हे नुकतेच दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपने शरद पवारांसमोर हा प्रस्ताव मांडण्यास अजित पवारांना सांगितले होते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
तसेच अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळे ठाकरे गटामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न चव्हाणांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, या बैठकी किती गरजेच्या आहेत, त्याबाबत आता शरद पवारांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे.