शरद पवारांच्या भेटीला दादांचा खास शिलेदार? राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची नांदी

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरं जात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. अशातच आता नाशिकमध्ये वेगळ्याच घडामोडी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येऊन गेले.

यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांची शरद पवारांसोबत भेट झाली का याबद्दलची भूमिका अद्याप तरी समोर आलेली नाही. तटकरे येऊन गेल्याच्या वृत्ताला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर देशमुख शरद पवारांसोबतच राहिले आहेत.

नाशिकची जागा पाचव्या टप्प्यात येते. या जागेसाठी २० मे रोजी मतदान होईल. याच पार्श्वभूमीवर मनमाडमध्ये शरद पवारांची सभा झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत अनिल देशमुख, जयंत पाटील उपस्थित होते. सभा झाल्यानंतर शरद पवार नाशिकमधील एमरॉल्ड पार्कमध्ये मुक्कामाला होते.

याच हॉटेलात रात्री सुनील तटकरे येऊन गेले. विशेष म्हणजे अनिल देशमुखांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. त्यांच्या नावाची चर्चा दिल्लीत झाली. गृहमंत्री अमित शहा त्यांच्या नावासाठी आग्रही होते.

पण शिवसेनेने नाशिकवरील दावा सोडला नाही. एकनाथ शिंदेंनी नाशिकचा विषय ताणून धरल्याने तिढा कायम राहिला. महिनाभर पेच कायम राहिल्याने अखेर भुजबळांनी माघार घेतली. नाशिकच्या जागेवरील दावा सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. आता भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारातही ते फारसे दिसत नाहीत. त्यांची यंत्रणाही प्रचारापासून लांब आहे. अशातच तटकरे याठिकाणी शरद पवार यांच्या हॉटेलमध्ये आल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कायतरी घडणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.