Uddhav Thackeray : मातोश्रीवर दणक्यात प्रवेश, शिंदेसेनेला नडले, पण ६ महिन्यातच ठाकरेंना सोडले; मोठ्या नेत्याची भाजपात घरवापसी

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांनी आता पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभव पत्करावा लागल्यानंतर परदेशींनी परतीचा मार्ग धरल्याचे दिसते. त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

डॉ. दिनेश परदेशी हे वैजापूरचे माजी नगराध्यक्ष असून, त्यांनी १५-२० वर्षे नगरपालिकेवर सत्ता भूषवली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांनी शिवबंधन हाती बांधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, वैजापूर मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट)चे डॉ. रमेश बोरनारे यांच्याकडून ४० हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर परदेशींनी पुन्हा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांनीही भाजपमध्ये पुनरागमन केले होते. बनकरांनी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध निवडणूक लढली होती, परंतु त्यांना यश मिळाले नाही. अडीच महिन्यांच्या आत त्यांनीही भाजपमध्ये ‘घरवापसी’ केली.

भाजपच्या ‘मिशन परत फिरा रे’ अंतर्गत मराठवाड्यात अनेक नेते पुन्हा पक्षात सामील होत आहेत, तर कोकणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘ऑपरेशन टायगर’ राबवत आहे. डॉ. दिनेश परदेशींच्या भाजपमध्ये पुनरागमनाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे निरीक्षकांनी नोंदवले आहे.

डॉ. परदेशींच्या निर्णयामागे निवडणुकीत मिळालेला पराभव आणि राजकीय परिस्थिती ही मुख्य कारणे असावीत, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पुनरागमनाला उत्साहाने स्वागत केले आहे. पक्षाच्या ‘मिशन परत फिरा रे’ अंतर्गत आता अधिक नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याचे धोरण भाजपने आखले आहे.