अजित पवारांना धक्का! हक्काचा आमदार शरद पवार गटात जाणार, खासदारकीची केली तयारी…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार हे नक्की झाले आहे.

निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती.

आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. याबाबत त्यांनी मात्र याला दुजोरा दिला नाही. दरम्यान, लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती.

कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला असल्याचे बोलले जात आहे. आता येणाऱ्या काळात याठिकाणी काय घडामोड घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर असे झाले तर सुजय विखे यांना ही निवडणूक खूपच जड जाणार असल्याचे सांगितले जात आहे.