शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. सुरुवातीला सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. असे असताना मात्र डॉ. शिंगणे यांनी अजित पवार गटाची वाट धरली. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते.
मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तग धरून उभी राहते की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. असे असताना शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी आपल्या काकांना धक्का दिला.
त्यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही मिळविली आहे. यामुळे याठिकाणी आता शरद पवार यांच्या पक्षाला बळ मिळणार आहे. यामुळे शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमधील संबंधांची चर्चा नव्याने होऊ लागली आहे.
सहकार महर्षी दिवंगत भास्कर शिंगणे यांची नात व आ. शिंगणे यांची पुतणी गायत्री गणेश शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. आपण करत असलेल्या कामांचा आढावा त्यांच्यापुढे मांडला. यामुळे शरद पवार यांनी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे.
गायत्री यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला यामुळे फायदा होणार आहे.
यामुळे येणाऱ्या काळात याठिकाणी अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. याठिकाणी शरद पवार यांनी आता बेरजेचे राजकारणात करत आहेत. सध्या अनेक ठिकाणी अनेक नेते पक्षांतर करत आहेत.