Uttar Pradesh : बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही मुलगी गर्भवती होताच या नराधमामुळे तिचा गर्भपात झाला.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. एक बाप आपल्या मुलीशी इतका क्रूर कसा वागू शकतो, असा सवाल पोलिसांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण विचारत आहेत. ही संपूर्ण घटना कानपूरच्या जुही भागात घडली.
गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना खोलीतून मुलीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. घरगुती वादातून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज घरातून येत असावा, असे लोकांना वाटले. पण दिवसभरात हे आवाज वारंवार येऊ लागल्यावर शेजाऱ्यांनी एकत्र येऊन या घरात काय चाललंय ते पाहायचं ठरवलं.
दरवाजा ठोठावल्यावर एका व्यक्तीने आतून दरवाजा उघडला. घरातून दररोज ओरडण्याचे आवाज येत असल्याची चौकशी करण्यात आली. घरात उपस्थित असलेल्या व्यक्तीने सुरुवातीला काहीच माहीत नसल्याची बतावणी केली. नंतर त्याने आरडाओरडा ऐकून घरात मुले खेळत असल्याचे शेजाऱ्यांना उत्तर दिले.
पण या व्यक्तीच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसला नाही. घरी मुलं कुठे आहेत? असा प्रश्न विचारला. मुलांची तब्येत ठीक नसल्याचं या व्यक्तीने सांगितलं. यानंतर लोक निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर शेजारी पुन्हा या घराच्या दारात आले.
तेव्हा या माणसाच्या मुलीने दरवाजा उघडला. शेजाऱ्यांनी मुलीची विचारपूस केली असता ती अचानक जोरजोरात रडू लागली. मुलीने सांगितले की तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. मुलीने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, माझे वडील गेल्या काही दिवसांपासून सतत माझ्यावर बलात्कार करत आहेत.
या मुलीने तिचा एकदा गर्भपात झाल्याचे सांगताच शेजारी आश्चर्यचकित झाले. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. आरोपीने सुरुवातीला आपला गुन्हा कबूल केला नाही.
आरोपीचा दावा आहे की माझ्या मुलीने शेजाऱ्यांच्या दबावाखाली खोटी तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस आता वैद्यकीय चाचण्या आणि इतर माध्यमातून या प्रकरणाचा तपास करत आहेत.